feedpune news News: अभिवाचनातून साहित्याचा आविष्कार ! – invention of literature!

- year ender poll - feedpune news News: अभिवाचनातून साहित्याचा आविष्कार ! – invention of literature!

साहित्याविषयी गोडी वाढण्याबरोबर संवेदनशील मनाची जडण-घडण

Chintamani.Patki@timesgroup.com

@chintamanipMT

पुणे : पुस्तकातून अभिव्यक्त होणारे लेखन आणि त्याचा वाचकांशी घडणारा संवाद…म्हटले तर ही प्रक्रिया तरल आणि सुखावणारी; पण आविष्कार, सादरीकरण, दृकश्राव्य परिणाम महत्त्वाचा झालेल्या आजच्या काळात साहित्याचाही दृकश्राव्य आविष्कार गरजेचा झाला आहे. मुळात साहित्य हाच आविष्कार असताना अभिवाचनासारख्या कार्यक्रमांमधून साहित्याचा दुहेरी आविष्कार सध्या अनुभवता येत आहे. पुस्तक कोण वाचत, अशी चर्चा होण्याच्या दिवसात साहित्य सर्व स्तरात झिरपावे आणि त्याचा परिणाम साधला जावा यासाठी अभिवाचनाचे अभिनव उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमाची संख्या वाढल्याने शहरात प्रत्येक दिवशी साहित्याचा गजर होत आहे.

विशिष्ट पुस्तकातील उताऱ्याचे अथवा कवितेचे वाचन, वाचनाला संगीताची साथ, साजेसे एखादे गीत अथवा नृत्य, उतारा अधिक प्रभावीपणे पोहचवण्यासाठी नाटिका, विशिष्ट प्रकाशयोजना असे स्वरूप असलेल्या अभिवाचन कार्यक्रमांची संख्या शहरात वाढू लागली आहे. दरदिवशी अशा प्रकारचा कोणता ना कोणता कार्यक्रम शहरात रंगत आहे आणि साहित्याचा दरवळ रसिकांपर्यंत पोहचत आहे. अनेक साहित्य व नाट्य संस्था अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत असून, नवीन कलाकार रंगभूमीला मिळत आहेत. या प्रयोगांविषयी विचारले असता, कलाकारांनी साहित्याच्या आविष्काराचा मानवी मनावर होणाऱ्या परिणामाचा महत्त्वाचा मुद्दा मांडला. अशा कार्यक्रमातून साहित्याविषयी गोडी तर वाढतेच; पण संवेदनशील मनाची जडण-घडण होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

एक नाटक बसवणे आणि अभिवाचनाचा एक कार्यक्रम आयोजित करणे यातील कष्ट सारखे असले तरी अभिवाचनाचा प्रयोग कोणत्याही ठिकाणी करणे सहज शक्य आहे. रसिकांना साहित्याचा आविष्कार आवडू लागला आहे. अभिवाचन केवळ मनोरंजनापुरते नाही. आमच्या ‘चित्रकारांचे बालपण’ या कार्यक्रमात डॉ. नितीन हडप चित्रांकडे कसे बघायचे, त्याविषयी सांगतात व मी चित्रकारांचे बालपण सांगतो. चित्र वाचण्याची समज यामुळे निर्माण होते. कथाकार जी. ए. कुलकर्णी व सुनीताबाई यांच्या पत्रांचे वाचन आम्ही नियमितपणे करतो. त्यातून व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे कळतात. जीवनाकडे तटस्थपणे बघण्याचा दृष्टिकोन मिळतो.

– अमृत सामक, रंगभाषा

अभिवाचन कार्यक्रमांमुळे लोकांना नवनवीन साहित्य ऐकायला मिळत आहे. ज्ञानात भर पडत आहे. यामुळे विचार करण्याची पद्धत बदललेली दिसते आणि विचार करण्याची क्षमता वाढलेली दिसते. संगीताचा परिणाम साधला जातो.

– अनुराधा मराठे, गायिका

Source