शिक्षकांना दाखवला किनवट, माहूरचा घाट नांदेड : जिल्ह्यातील वेगवेगळ्या खासगी शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत अनेक संस्थाचालकांनी …
| Updated:Jan 4, 2020, 04:00AM IST
शिक्षकांना दाखवला किनवट, माहूरचा घाट नांदेड : जिल्ह्यातील वेगवेगळ्या खासगी शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत अनेक संस्थाचालकांनी नकार घंटा दाखवलेली असताना शिक्षण विभागाने ६४ अतिरिक्त शिक्षकांना जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रतिनियुक्ती दिली. विशेष म्हणजे या सर्व शिक्षकांना किनवट, माहूरचा घाट दाखवण्यात आला आहे. विद्यार्थी संख्येअभावी अतिरिक्त ठरलेल्या १५५ पैकी ३८ शिक्षकांचे खासगी शाळांमध्ये समायोजन करण्यात आले होते. एक दोन नामांकित शाळा वगळता, बहुतांश संस्थाचालकांनी शिक्षण विभागाच्या या आदेशाला केराची टोपली दाखवली. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले नाही तर, संबंधित शाळांमध्ये रिक्त पद व्यपगत केले जाईल, असा इशारा शिक्षण विभागाने दिला होता. पण त्यालाही अनेक संस्थाचालकांनी जुमानले नाही. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अधिपत्याखाली शारदा भवन शिक्षण सस्थांसह अन्य एक दोन संस्था चालकांनी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करत शिक्षण विभागाचे आदेश पाळले. ज्या संस्थाचालकांनी अतिरिक्त शिक्षकांना समायोजित करून घेतले नाही, त्यांना पुन्हा एकदा समज देऊन संधी देण्यात येणार आहे. त्याउपरही त्यांनी टोलवाटोलवी केल्यास कारवाई करण्याची तयारी शिक्षण विभागाने चालविली आहे. खासगी शाळांमधील नकारघंटा लक्षात आल्यानंतर उर्वरित ६४ अतिरिक्त शिक्षकांना तात्पुरत्या स्वरुपात माहूर, किनवट व हिमायतनगर तालुक्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. या तीन तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये रिक्त पदांची संख्या मोठी आहे. अतिदूर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तीनही तालुक्यात खासगी शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांना पाठवण्यात आल्याने या भागातील पदाधिकाऱ्यांची ओरड कमी होईल, असे मानले जात आहे. शिक्षण विभागाने याबाबतचे आदेश जारी केल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. बहुतांश अतिरिक्त शिक्षक नांदेड शहरातील आहेत. नांदेडपासून किनवटचे अंतर १२५ किलोमीटरचे आहे. आता नव्या पदस्थापनेवर ये-जा कशी करावी, अशी चिंता आहे. अनेक अतिरिक्त शिक्षक निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. शिवाय अनेकांनी वैद्यकीय कारणही पुढे केले आहे. काही जण स्वेच्छा निवृत्तीच्या तयारीत आहेत. शैक्षणिक वर्षातील अंतिम टप्प्यात अशा प्रकारचे समायोजन केल्याबाबत अनेकांनी नाराजीचा सूर काढला असला तरी जे शिक्षक या आदेशानंतर रुजू होणार नाहीत, त्यांचे व त्या शाळांमधील संबंधित मुख्याध्यापकांचे मासिक वेतन तात्काळ थांबवावे, अशा सूचना वेतन पथकातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. हे आदेश निघाल्यानंतर अनेकांनी पदस्थापना बदलून मिळण्यासाठी पुढाऱ्यांचे उंबरठे झिजवणे सुरू केले आहे.
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवाWeb Title
deployment of 4 additional teachers to zp schools
(मराठी बातम्या from Maharashtra Times , TIL Network)